Friday, April 8, 2016

अश्शी सासू सुरेख बाई...!

लग्न झाल्यावर सुरुवातीच्या दिवसांत वैताग आणला तो सासूबाईंच्या भाषेने म्हणजे त्यांच्या भाषावैभवाने! वाक्यागणिक येणारे ते वाक्प्रचार, म्हणी… ते वक्रोक्ती अलंकार असलेले शब्द. कितींदा तरी त्याचा अर्थच कळायचा नाही. म्हणजे त्यातला गर्भितार्थच कळायचा नाही. त्यांचा उद्देश कळायचा नाही. मी मख्ख चेहर्‍याने उभी असायचे. तसं तर शाळेत असताना वाक्प्रचार, म्हणी शिकले होते. पण त्याचा बोलण्यात इतका सढळपणे वापर मी पहिल्यांदाच बघत होते. शिवाय त्यांचा तो कोल्हापुरी ठसका.
एकदा मला रात्री माझं काही काम आठवलं ते करत बसले. त्या लगेच म्हणाल्या, 'हे काय? आता काम करत बसलीस? दिवस गेला उटारेटी आणि चांदण्यात कापूस वेची. 'मी येडपटासारखी बघत बसले. एकदा मी काहीतरी पदार्थ केला थोडासाच केला होता. बरा झाला. सासूबाईंना बहुतेक आवडला असावा. कारण त्यांनी तो परत मागितला. 'संपला' म्हटल्यावर त्या बोलल्या, 'हं एवढसंच करायचं, तोंडाला चव लागते, पण 'आड जीभ खाई अन् पडजीभ बोंबलत जाई'. शेजारीण म्हणाली मला, 'छान केलास हो पदार्थ… सुगरण आहेस' तर लगेच त्या म्हणाल्या 'तर तर! एका पिसानं कधी मोर होत नाही.'
माहेरच्या दूरच्या नात्यातल्या लग्नाचं निमंत्रण आलं म्हणून मी अगदी मोहरून गेले. जायच्या तयारीला लागले तर त्या म्हणाल्या लगेच 'हं देशस्थी नातं… आऊच काऊ तो माझा मावसभाऊ' आधीच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा… कामं राहिली बाजूला आणि ही लागलीय नाचायला.' एक बरं होतं मला त्या काय म्हणताहेत ते काहीच कळत नव्हतं आणि मला जाणून घ्यायची आवश्यकताही वाटली नव्हती.
आम्ही एकदा ओळखीच्यांकडे गेलो होतो. म्हणजे सासूबाईंच्या मैत्रिणीकडे. त्यांची सून भलतीच जाड झाली होती. आम्ही गेलो तर जाड सुनेला काही काम करवत नव्हतं. लगेच धापा टाकत होती. हाश्य हुश्य करत होती. मग तिच्या चटपटीत सासूनेच छानपैकी भजी केली. चहा केला, सासूबाई मला हळूच म्हणतात, 'तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्‍या झाल्या हरण्या' हे मात्र लगेच कळलं हं. मला हसूच आलं एकदम. गंमत म्हणजे सासूबाईंची मैत्रीणही त्यांच्यासारखीच छान म्हणी वापरत होती. त्यांची सून मुलाला शाळेतून आणायला गेली होती तोपर्यंत मैत्रिणींचं मन मोकळं करणं चाललं होतं.
'काय सांगायचं आपलंच नाणं खोटं. माझा लेक आधी किती मला विचारायचा… आणि आता 'अगं अगं बायले, तुला सारं वाहिले'. नुसता बाईलबुद्ध्या झालाय. तरी बरं कामं सगळी मीच करते. तिचं काम म्हणजे सहा महिन्यांची जांभई… हळूबाई नुसती.' नुसतं गोरं कातडं पण म्हणतात ना 'रंगाने गोरी, हजार गुण चोरी'.
मग त्या दोघींच्यात तिसर्‍या मैत्रिणीचा विषय निघाला. तिला मूलबाळ नव्हतं, पण एकाला मुलगा समजून वाढवलं होतं. पण त्याला इतकी काही जवळीक वाटत नव्हती. त्याच्याबद्दल बोलताना म्हणाल्या, 'किती झालं तरी मातीचे कुल्ले… सुकल्यावर गळून पडणारच.' ही मानलेली नाती काय खरी असतात? जाळाशिवाय कढ नाही, मायेशिवाय रड नाही. पण खरं तर आधी गुंतू नये, मग कुंथू नये.' माझ्या हातात कुठलं तरी साप्ताहिक होतं. त्यातल्या पेज थ्री टाइप चविष्ट बातम्यांपेक्षा मला त्या दोघींचं संभाषण म्हणजे त्यातली भाषा त्या क्षणी जास्त इंटरेस्टिंग वाटत होती.
सासूबाईंच्या बरोबर घरी यायला निघाले. मध्येच महिला मंडळाच्या कोणी भेटल्या. त्यांना माझं लेक्चर ठेवायचं होतं. सासूबाई पुटपुटल्याच 'गावढ्या गावात गाढवी सवाष्ण.'
एकदा माझा भाऊ आला होता. गप्पीष्ट आहे. परत घरी जायला निघायचा तोपर्यंत परत काही छान विषय निघायचा. चपला काढून ठेवायचा. परत गप्पांत सामील. सासूबाई म्हणतात, 'तुझं म्हणजे अगदी जातो जातो, साळीचा भात खातो चाललंय' एकच हशा… माझा भाऊ हसत म्हणाला, 'तुमचा म्हणींचा संग्रह आवडतो बरं का…'
तर त्या ठसक्यात म्हणतात कशा, 'कुणाला कशाचं तर बोडकीला केसांचं कौतुक!' तुला नाहीयं उद्योग. उगा माझ्या मागे लागलाय. 'काम नाही घरी अन् सांडून भरी.'
अश्शी सासू गोड बाई भाषेला नटवते…
– शैलजा भा. शेवडे

No comments:

Post a Comment