Friday, April 8, 2016

संपूर्ण मैफल - पुरणपोळी

पुरणपोळी ही  भैरवीसारखी(प्रभू अजि गमला  मनी तोषला)आहे . किमानपक्षी सूर जरी नीट लागले तरी भैरवी कमीअधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं की  पुरणपोळीची वैगुण्य क्षम्य आहेत.
              पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा ( जाणकारांसाठीचा )आनंद आहे आणि भोजन म्हणजे परमानंदाचा कळस आहे.
         डाळ निवडून घेणे ई. भूप ( पंछी बनू उडती फिरु मस्त  गगन  मे ) किंवा बिलावल आहेत. जास्त कसब गरजेचं नाही. कणिक मळणे हा खमाज
( गुंतता ह्रदय हे कमल दलाच्या  पायी) आहे.रटाळ तरीही थाटाचा असल्याने गरजेचा!
            गूळ  म्हणजे यमन ( चाफा बोलेना; चाफा चालेना ).यमन हा रागांचा राजा तसंच गुळाचं महत्व.
      इथं "तीव्र मध्यम "श्रुतीमनोहरच लागायला हवा म्हणजे गुळाचा  हात नेमकाच पडायला हवा (अन्यथा बट्ट्याबोळ ...!)
            हा आता  ज्यांना  जमतं आणि गमतं ( 'प्रभू अजि गमला 'या  अर्थाने )नाही ते दोन्ही मध्यम  घेऊन त्याचा यमनकल्याण ( तोच चंद्रमा नभात ) करतात म्हणजे, गुळात साखरही मिसळतात .

         जायफळाची एखादी ठुमरी झाली की लगेच पुरण शिजवायचे ते अगदी 'देस '(देह  देवाचे मंदिर) प्रमाणे. 'गनिसा 'ही  संगती  देस ची ओळख  (सिग्नेचर )तसंच रटरट आवाजाबरोबर घमघमाट येणे ही पुरणाची सिग्नेचर मानावी. पुरण  आणि  देस  हे  ओघवते  असावेत  पण  चंचल  नकोत.
       नंतर  होरीप्रमाणे पुरणाचं  वाटप करायचं. म्हणजे  लवकर 
आपटायचं .....ख्या  ख्या आता  महत्वाचा टप्पा....!पोळ्या  करणे!
बिहागचा(मम  आत्मा गमला ) टप्पा  साधायला  कुण्या  दिग्गज  हाद्यूखान अशांचीच तालीम  हवी. आणि
सगळेच मालिनीताई  होत नाहीत हे ही विनयशीलतेन मान्य  करायला हवं.
रागाला  शरण  जाव तशी  निगर्वी  शरणागती झाली  तर  हळूहळू  जमेल. पण  तपश्चर्या  हवी. आता  तशा  कमालीच्या  रागरस-संपन्न  मैफिलीत तराणा  यावा तशी तुपाची धार.

       तराणा मूळ  आलाप -जोड यापासून  वेगळा  काढता येऊ  नये. अगदी  तस्संच  तुपानं पोळीशी अव्दैत
करुन  असावं. मग "जो भजे हरी को सदा....'',चिन्मया  सकल  ह्रदया" अशा विविध  रुपांनी सर्वगुणसंपन्न  भैरवीचं रसग्रहण  करावं  त्याप्रमाणे एकेक  घास  जीभेवर  ठेऊन  असीम  आनंद  घ्यावा व  मग "हेचि दान देगा
देवा'' अशा  थाटात "अन्नदाता सुखी  भव" म्हणावं.

          भैरवीचे सूर  दीर्घ  काळ  मनात रेंगाळावेत तशी  पुरणपोळीची  चव  जिभेवर  रेंगाळावी,दिवस  सार्थकी  लागावा....!

                       ----- पु. ल. देशपांडे

          

No comments:

Post a Comment